दावरवाडीला ३५ वर्षांनंतर एसटी बससेवा सुरू

Foto
पैठणकर सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष 
किशोर तांगडे यांच्या पाठपुराव्याला यश

पैठण, (प्रतिनिधी) : दावरवाडी ग्रामस्थांच्या तब्बल ३५ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सन १९९० मध्ये दावरवाडी ते छत्रपती संभाजीनगर अशी बससेवा सुरू झाली होती. परंतु कालांतराने ती बंद पडली होती. त्यानंतर तब्बल ३५ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा दावरवाडी गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरसाठी एसटी बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, या बससेवेमुळे गावाच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

दावरवाडी व परिसरातील नागरिकांना नियमित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शासकीय कामे आणि वैद्यकीय उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांवर किंवा पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते.

ही समस्या लक्षात घेऊन मी पैठणकर सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष किशोर अशोकराव तांगडे यांनी
ग्रामस्थांच्या वतीने संबंधित एसटी प्रशासनाकडे निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला. दावरवाडी गावातून नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीची एसटी प्रशासनाने दखल घेत दावरवाडी येथून छत्रपती संभाजीनगरकडे बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तब्बल ३५ वर्षांनंतर ग्रामस्थांची जुनी मागणी प्रत्यक्षात आली आहे. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पहिली एसटी बस छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दावरवाडी येथे दाखल झाली. पहिली बस गावात दाखल होताच ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी बसचे चालक व वाहक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या बससेवेमुळे दावरवाडी व परिसरातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नागरिकांना शासकीय व प्रशासकीय कामांसाठी, तसेच रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी शहरात जाणे अधिक सुलभ होणार आहे.

विशेष म्हणजे, रात्री ८ वाजता पैठणहून सुटणारी शेवटची बस दावरवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे येऊन नांदर येथे मुक्कामी जाणार आहे. त्यामुळे दिवसभर शहरात कामानिमित्त गेलेल्या नागरिकांना परतीच्या प्रवासाचीही सुविधा उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, डेरा फाटा येथे बस थांबविण्याची मागणीही करण्यात आली होती. या मागणीची दखल घेण्यात आल्याने परिसरातील प्रवाशांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

दावरवाडी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागून गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी थेट बससेवा सुरू झाली, ही समाधानाची बाब आहे. भविष्यातही गावाच्या सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, अशी प्रतिक्रिया मी पैठणकर सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष किशोर अशोकराव तांगडे यांनी व्यक्त केली.